Home Breaking News नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठाम मागणी

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठाम मागणी

46
0
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित असलेली सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ निश्चित झालेल्या मार्गानेच सुरू करण्यात यावी, अशी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी आज केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्यात आली. नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण मार्गे पुणे असा हा प्रस्तावित मूळ मार्ग भौगोलिक, तांत्रिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत योग्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि औद्योगिक पट्टा थेट जोडला जाणार असून, शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील अडचणी लक्षात घेऊन २०२० मध्ये सुधारित डीपीआर (Detailed Project Report) मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
माजी महसूल मंत्री असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, हेही यावेळी नमूद करण्यात आले. त्यामुळे आता नव्याने उपस्थित होत असलेल्या अडचणी दूर करून प्रकल्पाला गती देणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. मार्ग बदलल्यास प्रकल्प अनेक वर्षे रखडण्याची शक्यता असून, त्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास थांबेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
या भेटीदरम्यान या मार्गावरील नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विकासाच्या संधी रेल्वेमंत्र्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्यात आल्या. हा मार्ग सध्या प्रत्यक्षात उतरवला गेला, तर पुढील अनेक दशकांसाठी पायाभूत सुविधा मजबूत होतील. अन्यथा, पुन्हा संधी मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागेल, असेही सांगण्यात आले.
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून, तो संपूर्ण प्रदेशाच्या भविष्याचा कणा असल्याचे सांगत, या लढाईत सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.