Home Breaking News “शिवसेवा प्रतिष्ठानच्या ‘वंदे मातरम् 2026’ रोजनिशीचे भव्य प्रकाशन; राष्ट्रभक्तीचा उत्सव पुण्यात उत्साहात”

“शिवसेवा प्रतिष्ठानच्या ‘वंदे मातरम् 2026’ रोजनिशीचे भव्य प्रकाशन; राष्ट्रभक्तीचा उत्सव पुण्यात उत्साहात”

103
0
पुणे – भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा असलेल्या ‘वंदे मातरम्’ या अनन्यसाधारण गीताला यंदा 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाली. देशाच्या भूमीतली राष्ट्रप्रेमाची पवित्र माती, भारतीयांच्या हृदयातील निस्सीम देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी वाहिलेल्या बलिदानांचा सुवर्ण इतिहास या मंत्रात दडलेला आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ शिवसेवा प्रतिष्ठान तर्फे 2026 ची विशेष स्मृती रोजनिशी (डायरी) प्रकाशित करण्यात आली. ही रोजनिशी केवळ एक पुस्तक नसून, देशभक्तीचे ध्येय जपणारी मूल्यांची शिदोरी आहे.
रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) च्या टाटा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात या रोजनिशीचे प्रकाशन करण्यात आले. सभागृहात राष्ट्रभक्तीची ऊर्जा जाणवत होती. विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, शिवसेवा प्रतिष्ठानचे हितचिंतक आणि शेकडो युवक-युवतींची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष उंची देणारी ठरली. मुख्य पाहुणे म्हणून वंदे मातरम् चे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस, मध्य रेल्वे पुणे विभागाचे मेकॅनिकल प्रमुख श्री. विजय दडस, तसेच संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि ऐतिहासिक दोन्ही परिमाणांची जोड मिळाली.
शिवसेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. सुनील व्हरांबळे यांनी संस्थेच्या 2017 पासूनच्या प्रवासाची माहिती दिली. मावळ तालुक्यातील दुर्गम खेड्यांतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, सायकल वितरण, चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या आदिवासी पाड्यांना मदत, लोणावळ्यातील संस्कारवर्ग, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य अशा विविध उपक्रमांनी शिवसेवाने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावले आहे. पवनानगर येथील येळसे गावात शाळेतील कंपाउंड व मोठ्या हॉलचे बांधकाम हीही शिवसेवाची उल्लेखनीय कामगिरी आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थाध्यक्ष श्री. धनंजय चंद्रात्रे यांनी केली. त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत शिवसेवाने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर अशांसारख्या थोर व्यक्तिमत्वांवर आधारित रोजनिशी प्रकाशित केल्या असून, यंदा 150 वर्ष पूर्ण झालेल्या वंदे मातरम् या राष्ट्रमंत्राला सलाम म्हणून 2026 ची रोजनिशी तयार करण्यात आली आहे. मुख्य पाहुणे श्री. मिलिंद सबनीस यांनी आपल्या प्रभावी भाषणातून वंदे मातरम् चा ऐतिहासिक प्रवास उलगडला. त्यांनी क्रांतीकारकांनी हे गीत शस्त्रासारखे हातात धरून देशासाठी लढा दिल्याची कहाणी सांगताना सभागृह भारावून टाकले.
प्रमुख वक्ते श्री. प्रमोद कुलकर्णी यांनी शिवसेवाच्या उपक्रमांचे कौतुक केले. आजच्या पिढीला राष्ट्रप्रथम ही भावना आत्मसात करणे किती अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. “वंदे मातरम् हा मंत्र केवळ शब्दांचा समूह नाही, तो राष्ट्रकर्ता बनवणारा संस्कार आहे,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री श्री. दादा वेदक यांचीही उपस्थिती विशेष ठरली.
कार्यक्रमाचा सर्वांत भावनिक टप्पा म्हणजे स्वर तरंग अकादमीच्या 15 विद्यार्थ्यांनी गायलेली राष्ट्रभक्तिपर गाणी व संपूर्ण वंदे मातरम् ची सुमधुर प्रस्तुती. सभागृहात राष्ट्रप्रेमाची तरलता पसरली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संकेत खळदकर व श्री. गुरुराज कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. मंजिरी भुसारी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे—आशुतोष जोशी, पराग खिरे, अभिजीत चिणे, अश्विन डंके, धनंजय भोईटे, नचिकेत सुरनीस, प्रमोद देशपांडे, प्रल्हाद देशपांडे, मंगेश भुसारी, महेश भुसारी, रितेश गुप्ता, राजेश येवले, राजेश कामठे, नीलाक्षी गोडबोले, अजित घमंडे—उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पूर्ण वंदे मातरम् ने होऊन उपस्थित सर्वांनी देशभक्तीचा नाद मनामनांत साठवून घेतला.