दिल्ली | देशातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे उड्डाण परिचालन विस्कळीत झाले आहे. या अचानक झालेल्या बिघाडामुळे अनेक विमानांची वेळ बदलण्यात आली असून काही उड्डाणे रद्दही करावी लागली आहेत. प्रवाशांना विमानतळावर तासन्तास थांबावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये (Air Traffic Management System) आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे विमानांची हालचाल सुरळीतपणे नियंत्रित करता येत नसल्याने विमानतळावरील सर्व कामकाज काही काळासाठी मॅन्युअल पद्धतीने पार पाडावे लागत आहे.
या तांत्रिक समस्येमुळे दिल्ली विमानतळावरून सुटणाऱ्या आणि दिल्लीला येणाऱ्या दोन्ही दिशांच्या दहाेक उड्डाणांमध्ये विलंब झाला आहे. प्रवाशांना वारंवार उड्डाणाच्या वेळांबाबत बदलत्या घोषणांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
विमानतळ प्रशासनाने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमच्या तांत्रिक टीमने बिघाडाचे मूळ कारण शोधून काढले आहे आणि प्रणाली पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.”
दरम्यान, या घटनेनंतर विमान कंपन्यांनीही त्यांच्या प्रवाशांना अॅप आणि ईमेलद्वारे उड्डाणांच्या नव्या वेळांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण सेवा विस्कळीत झाली होती, त्यामुळे ही पुनरावृत्ती होत असल्याची टीका नागरिक करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या विमानतळावर वारंवार अशा तांत्रिक अडचणी निर्माण होणे चिंताजनक आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रश्नही निर्माण होतात.