नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-विदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव आजपासून (१७ सप्टेंबर) सुरू झाला आहे. हा लिलाव केवळ एक सोहळा नसून त्यामागे सामाजिक बांधिलकीचा हेतू आहे. या लिलावातून जमा होणारी संपूर्ण रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.
यंदाच्या लिलावात सुमारे २,७०० हून अधिक भेटवस्तू उपलब्ध आहेत. यात विविध राज्यातील पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तू, खेळाडूंनी दिलेली स्मृतिचिन्हे, धार्मिक व सांस्कृतिक वस्तू तसेच खास व्यक्तींकडून दिलेल्या दुर्मिळ भेटवस्तूंचा समावेश आहे.
या लिलावात सहभागी होण्यासाठी साधारण १७०० रुपयांपासून बोली लावता येईल, ही सर्वसामान्यांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे. ऑनलाइन माध्यमातून नागरिकांना थेट या लिलावात सहभागी होता येणार आहे.
मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये गंगाघाटांची कलाकृती, रुद्राक्षाच्या माळा, आयकॉनिक चित्रं, शिल्पं, तलवारी, तसेच खेळाडूंनी दिलेली पदकं व जर्सी यांचाही समावेश आहे. या भेटवस्तूंची भावनिक व ऐतिहासिक किंमत अधिक असून त्यामुळे लिलावाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सरकारच्या या उपक्रमामुळे एका बाजूला संस्कृती व परंपरेचे दर्शन घडते, तर दुसरीकडे पर्यावरण रक्षण आणि गंगा स्वच्छतेसाठी निधी गोळा करण्यास मदत होते.
या लिलावाची सुरुवात होताच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. अनेकांना आपल्या आवडत्या पंतप्रधानांना मिळालेल्या वस्तूंचा भाग होण्याची संधी मिळणार आहे, याचा अभिमान वाटतो आहे.