पुणे : सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुलनेत डिजिटल मीडियावर वाचक आणि प्रेक्षकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे डिजिटल मीडियाला आता अधिक विश्वासार्हता प्राप्त होत आहे. या वाढत्या विश्वासार्हतेची दखल घेत, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद यांच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत डिजिटल पत्रकारांचे संघटन करण्यात आले आहे. पुढील काळात अशा विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या न्यूज पोर्टल्स व यु ट्यूब चॅनल्सना राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुण्यात केली.
ही घोषणा अ.भा. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत करण्यात आली. पुणे शहरात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील तब्बल ७० प्रमुख सदस्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत पत्रकारांसमोरील विविध प्रश्न, डिजिटल माध्यमातील आव्हाने व त्यावर उपाययोजना, पत्रकारांचे हक्क यावर साधक-बाधक चर्चा झाली.
बैठकीदरम्यान पुणे महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गव्हाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी प्रज्ञा आबनावे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी त्यांचा संघ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न होत असल्याची घोषणा केली.
बैठकीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय उपाध्यक्ष गणेश मोकाशी, उपाध्यक्ष रमेश निकाळजे, हणुमंत देवकर, चिंतामणी क्षिरसागर, अनिल वडगूळे, संजय बारहाते, विनोद माझिरे, विनय सोनवणे, रवी पाटील, रविंद्र वाळके, ॲड. संजय पाटील यांनी विविध सुचना मांडल्या.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रावणी कामत, कार्यालयीन सचिव जिवन शेंडकर उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक व इतिवृत्त वाचन जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन भरत निगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम. जी. शेलार यांनी मानले. या बैठकीचे यशस्वी नियोजन जिल्हा संघटक सुनील वाळूंज व प्रमोद गव्हाणे यांनी केले.
डिजिटल मीडियातील पारदर्शकता, जबाबदारी आणि विश्वासार्हतेला प्रोत्साहन देण्यासाठी होणारा हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा पत्रकारितेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. डिजिटल माध्यमातून कार्यरत असलेल्या पत्रकारांना यामुळे नवा आत्मविश्वास आणि ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.