Home Breaking News पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश : उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या अवमानाच्या...

पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश : उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या अवमानाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

64
0

पिंपरी चिंचवड | महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या कथित अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आज ऐतिहासिक आणि भव्य असा निषेध मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये पाच हजारांहून अधिक आंबेडकरी कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले.
मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली, तर शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या जोरदार निषेध सभेने झाला.

“सात दिवसांत कारवाई करा, नाहीतर पालिकेला टाळे”
सभेत आंबेडकरी चळवळीतील नेते आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने सात दिवसांच्या आत आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास महानगरपालिकेला प्रत्यक्षात टाळे ठोकण्याचे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनी भूषवले.

मोर्चातील प्रमुख उपस्थिती
रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे, अनुसूचित जाती मोर्चा भाजपा उपाध्यक्ष धर्मेंद्र सोनकर, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारी, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, तसेच दशरथ कसबे, संतोष निसर्गंध, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, प्रतीक कर्डक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर हजेरी होती, ज्यामुळे मोर्चाचा आवाज अधिक बुलंद झाला.

बनसोडे कुटुंबाचे आभार प्रदर्शन
सिद्धार्थ बनसोडे यांनी मोर्चेकरांना भावनिक शब्दांत धन्यवाद देत म्हटले, “अण्णांसाठी जनतेने दाखवलेले प्रेम आम्ही विसरणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.

कायदेशीर लढा सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय अवसरमल यांनी SC-ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दिला. निवेदन पोलीस उपायुक्त संदिप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त हिरे यांनी स्वीकारले.

भावनिक आणि कायदेशीर दोन्ही स्तरांवर लढा
हा मोर्चा केवळ भावनिकच नव्हता, तर कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याच्या ठाम निर्धाराचे प्रतीक होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचा आधार घेत, समाजातील अन्याय, अपमान आणि सत्ताधाऱ्यांच्या मनमानीविरुद्ध एकत्रितपणे उभं राहण्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला.