पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होण्यासाठी भारतीय रेल्वेने पुण्याहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे पुण्याचे कनेक्टिव्हिटी शेजारच्या प्रमुख शहरांशी अधिक भक्कम होणार असून, प्रवासाचा कालावधीही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
सध्या पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या दोन वंदे भारत सेवा सुरू आहेत. त्यात आता पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार नव्या मार्गांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण सहा वंदे भारत गाड्या पुण्याहून धावतील.
नवीन वंदे भारत मार्गांची माहिती:
पुणे–शेगाव वंदे भारत या मार्गावर दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे थांबे असतील. गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगावसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा फारच उपयुक्त ठरणार आहे.
पुणे–वडोदरा वंदे भारत लोनावळा, पनवेल, वापी आणि सुरत येथे संभाव्य थांबे. पुणे-वडोदरा प्रवास आता ९ तासांवरून ६-७ तासांवर येणार. महाराष्ट्र-गुजरात व्यापारी संबंध आणि पर्यटनासाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरेल.
पुणे–सिकंदराबाद वंदे भारत दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा (कलबुर्गी) थांब्यांसह, आयटी आणि शिक्षण क्षेत्रातले दोन प्रमुख हब जोडले जाणार आहेत. या मार्गावर सध्या लागणाऱ्या वेळेत २-३ तासांची बचत होणार आहे.
पुणे–बेळगाव वंदे भारत या गाडीस सातार, सांगली आणि मिरज येथे थांबे मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील उदयोन्मुख शहर बेळगाव आता पुण्याशी अधिक जलदपणे जोडले जाईल.
पुणे–नागपूर वंदे भारत स्लीपर लवकरच!
खुशखबर एवढ्यावरच थांबत नाही, पुणे-नागपूर दरम्यान स्लीपर वंदे भारत गाडी सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. ही गाडी रात्रीच्या वेळेस धावणार असून, प्रवाशांना झोपून आरामदायक प्रवास करता येणार आहे.
सुविधा आणि भाडे:
सर्व गाड्यांमध्ये एर्गोनॉमिक सीट्स, ऑटोमॅटिक दरवाजे, Wi-Fi, आधुनिक टॉयलेट्स आणि अत्याधुनिक सेफ्टी सिस्टीम असणार आहेत. भाडे ₹१५०० ते ₹२००० दरम्यान असण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल
रेल्वेच्या या निर्णयामुळे पुण्याचा देशभरातील इतर शहरांशी संपर्क वाढेल, प्रवाशांना वेळ आणि श्रमांची बचत होईल, आणि व्यावसायिक तसेच धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.