पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल येथे नुकताच पार पडलेला पालखी सोहळा हा विद्यार्थ्यांच्या भक्तिभावाने, पारंपरिक उत्साहाने आणि संतपरंपरेच्या जागृतीने भारलेला होता. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची भव्य पालखी मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या गजरांनी वातावरण भक्तिरसात न्हालं.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी पालखी सजवून, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांच्या वेशभूषेत प्रवेश केला. शाळेच्या आवारात पालखीची मिरवणूक काढून, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणला.
