Home Breaking News स्वप्नपूर्तीपासून पर्यावरण रक्षणापर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुआयामी प्रकल्पांचे लोकार्पण

स्वप्नपूर्तीपासून पर्यावरण रक्षणापर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुआयामी प्रकल्पांचे लोकार्पण

68
0
नागपूरकरांसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागपूरकरांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. कार्यक्रमात घराच्या चाव्या प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात आल्या.
निवडक लाभार्थी:
श्रावण कामत
मंजुश्री विजय टेंबुर्णे
राहुल सुरेश बावसकर
अतुल वानखेडे
मुस्ताक अहमद सौदागर
नीता चरण उईके
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, “माझ्या सरकारचा निर्धार आहे – महाराष्ट्राला बेघरमुक्त करायचा! गरीब, वंचित वर्गासाठी निवारा उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता आहे.”
 पर्यावरणीय संवर्धनासाठी पुढाकार – नागनदी प्रदूषणमुक्तीचा आराखडा जाहीर!
याच दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागनदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी व्हर्टिकल एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
 हे प्रकल्प व्हीएनआयटी आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागांवर उभारण्यात येणार आहेत. मुंबईप्रमाणेच व्हर्टिकल तंत्रज्ञानाचा वापर करून जागेचा अधिक कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला गेला. टीसीएसमार्फत तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
 नागपूर पाणीपुरवठा आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील पाणी टाक्यांमध्ये दाब नसल्याने होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. पाणी टाक्या वेळेत भरल्या नाहीत, तर संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण विभाग रस्ते खोदकाम करत असतो, परंतु नंतर रस्त्यांचे समतलीकरण योग्य पद्धतीने होत नाही, त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत कडक निर्देश दिले.
 नागपूरच्या विकासासाठी नव्या आराखड्याचा विचार:
शहराच्या नवीन विकास आराखड्याच्या डीपीआरची तयारी सुरु करण्याचे संकेत देण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस विभागालाही सहभागी करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, तसेच महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, एमएसआयडीसी, महावितरण, महामार्ग प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर शहरासाठी ही केवळ योजनांची घोषणा नव्हे, तर विकासाच्या दिशेने घेतलेले ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे.