Home Breaking News पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेंबरपासून धावणार; तिकीट दर १२ रुपयांपासून

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेंबरपासून धावणार; तिकीट दर १२ रुपयांपासून

31
0

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेंबरपासून धावणार; तिकीट दर १२ रुपयांपासून.

जिल्हा न्यायालय ते मेगापोलिस सर्कल प्रवासासाठी ६२ रुपये; पहिल्या टप्प्यात १७ स्थानके सुरू, गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी मेट्रो

पुणे, दि. १ नोव्हेंबर :

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसह आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी होणार असून, ४ नोव्हेंबरपासून सकाळी सहा वाजता प्रवाशांसाठी नियमित सेवा सुरू होणार आहे. जिल्हा न्यायालय ते हिंजवडी फेज-३ येथील मेगापोलिस सर्कलपर्यंत प्रवासासाठी ६२ रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी मेट्रो सुरू होण्याबाबत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उर्वरित सहा स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होतील. उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

ही मेट्रो ‘पिंक लाइन’ किंवा ‘पुणेरी मेट्रो’ म्हणून ओळखली जाणार आहे. या मार्गासाठी २२ ट्रेन संच उपलब्ध असून, गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी ४ ते ७ ही गर्दीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता सेवा सुरू होईल, तर रात्री ११.४० वाजता जिल्हा न्यायालय स्थानकातून हिंजवडीच्या दिशेने शेवटची मेट्रो सुटेल.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी अंदाजे ४५ मिनिटे लागतील. सध्या आयटी कर्मचाऱ्यांना हिंजवडीपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ आणि वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

तिकिटासाठी प्रवाशांना तिकीट खिडकी, क्यूआर कोड तसेच व्हॉट्सॲपचा पर्याय उपलब्ध असेल. महामेट्रोच्या मोबाइल ॲपवरूनही तिकीट काढता येणार आहे. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांत जिल्हा न्यायालय स्थानकावरून हिंजवडी मार्गिकेसाठी स्वतंत्र तिकीट घ्यावे लागणार आहे. शहरातील तिन्ही मेट्रो मार्गिकांवर एकाच तिकिटातून प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

तिकीट दर पुढीलप्रमाणे :

– ० ते २ किमी – १२ रुपये

– २ ते ४ किमी – २५ रुपये

– ४ ते ८ किमी – ३७ रुपये

– ८ ते १२ किमी – ४५ रुपये

– १२ ते १८ किमी – ४९ रुपये

– १८ किमीपेक्षा अधिक – ६२ रुपये

दरम्यान, नोव्हेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. पाच वर्षांत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट असलेल्या प्रकल्पाला कोरोना आणि अन्य कारणांमुळे अनेकदा मुदतवाढ मिळाली. मार्च २०२५ ही अंतिम मुदतही उलटली. अखेर जवळपास आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.