Home Breaking News पुणे ग्रामीणमध्ये घरफोडी, मारहाण आणि लुटमारीच्या घटना; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

पुणे ग्रामीणमध्ये घरफोडी, मारहाण आणि लुटमारीच्या घटना; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

13
0

 पुणे ग्रामीणमध्ये घरफोडी, मारहाण आणि लुटमारीच्या घटना; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल.

मुळशीत ४ लाखांची घरफोडी; बारामतीत सोनसाखळी हिसकावून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; जुन्नर आणि शिरूरमध्ये मारहाणीच्या घटना
पुणे, दि. २६ ऑक्टोबर २०२६ (पोलखोलनामा न्यूज) : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत घरफोडी, मारहाण, सोनसाखळी चोरी आणि धमकीच्या घटना समोर आल्या आहेत. पौड, बारामती शहर, जुन्नर आणि शिरूर पोलीस ठाण्यांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुळशीत ४ लाख ५ हजारांची घरफोडी : मुळशी तालुक्यातील मुळापूर येथे २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी रामचंद्र बोडके यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे डोरले, मणीमंगळसूत्र आणि १ लाख १५ हजारांची रोकड असा एकूण ४ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास केला. पौड पोलीस तपास करीत आहेत.
बारामतीत तरुणाला मारहाण, सोनसाखळी हिसकावली : बारामतीतील माळावरची देवी परिसरात २४ ऑक्टोबर रोजी रात्री आकाश शेरे यांना काही जणांनी कोयते व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार आहे. आरोपींनी दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पाण्याची कंपनी चालवण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जुन्नरमध्ये शेतकऱ्याला मारहाण : शिरोली खुर्द येथे २४ ऑक्टोबर रोजी शेतातील विहिरीजवळ पाणी भरत असताना अविनाश मोरे यांना लाकडी काठी, लोखंडी सळई आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मनीष मोरे, ज्योती मोरे, खंडू मोरे आणि संतोष मोरे यांच्याविरोधात जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूरमध्ये गैरसमजातून मारहाण : करडे गावाजवळील देशमुखवस्ती परिसरात २२ ऑक्टोबर रोजी शेखर सरडे यांना गैरसमजातून मारहाण झाल्याची तक्रार आहे. रोहन तांबे आणि ओंकार तांबे यांनी लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप असून, शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.