Home Breaking News दिवाळीपूर्वी पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना  वेतनाचा दिलासा; बोनस मात्र नाहीच!

दिवाळीपूर्वी पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना  वेतनाचा दिलासा; बोनस मात्र नाहीच!

46
0

दिवाळीपूर्वी पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना  वेतनाचा दिलासा; बोनस मात्र नाहीच!

**३० ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण वेतन देण्याचे आदेश; ईपीएफ भरण्याबाबतही कंत्राटदारांना सक्त निर्देश**
**पुणे, दि. २५ ऑक्टोबर २०२६ 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ऑक्टोबर महिन्याचे संपूर्ण वेतन ३० ऑक्टोबरपर्यंत अदा करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मात्र, यंदाही बोनस मिळणार नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महापालिकेच्या विविध विभागांत मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. दिवाळीच्या काळात वेतनाला विलंब होऊ नये, यासाठी १ ते २० ऑक्टोबरपर्यंतची प्रत्यक्ष हजेरी आणि २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंतची संभाव्य हजेरी गृहीत धरून संपूर्ण महिन्याचे वेतन ३० ऑक्टोबरपर्यंत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासोबतच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा (ईपीएफ) भरणा निर्धारित मुदतीत करण्याचे आदेशही कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. संबंधित विभागांच्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हजेरी आणि वेतन निश्चित केले जाणार आहे.
दरम्यान, वेतनवाढीनंतर अनेक कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन २१ हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्याने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) लाभासाठीच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असले, तरी बोनसपासून वंचित राहावे लागणार असल्याने कंत्राटी कामगारांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.