सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत.
गुप्त माहितीच्या आधारे सैनिक कॅन्टीन परिसरात छापा; पिस्तूल, मॅगझीन आणि मोटारसायकल असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दमदार कारवाई करत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सासवड परिसरातील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागे करण्यात आली. आरोपीकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि मोटारसायकल असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व गुन्हे शोध पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड गावच्या हद्दीतील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागे एक व्यक्ती काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह थांबला आहे. त्याच्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच १२ टीएल ८७९६ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे सपोनि शंकर राऊत व गुन्हे प्रकटीकरण पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर एक इसम बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो आपले नाव-पत्ता सांगत नव्हता. संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित राजू माने (वय २४ वर्षे, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने मोटारसायकलच्या स्टूल बॉक्समध्ये पिस्तूल असल्याची माहिती दिली. त्यानंतर पंचांसमक्ष स्टूल बॉक्सची झडती घेतली असता त्यामध्ये स्टीलचे गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते पिस्तूल जप्त केले.
या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ४९२/२०२६ दाखल करण्यात आला असून, शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित माने याला अटक करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमाल
– ५० हजार रुपये किमतीचे गावठी स्टीलचे पिस्तूल
– १ हजार रुपये किमतीचे स्टीलचे मॅगझीन
– ४५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल
– एकूण किंमत : ९६ हजार रुपये