Home Breaking News रांजणगावमध्ये कामगाराचा खून; सात आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची...

रांजणगावमध्ये कामगाराचा खून; सात आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची कारवाई

31
0

रांजणगावमध्ये कामगाराचा खून; सात आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची कारवाई.

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध; आरोपी पोलिस कोठडीत

रांजणगाव, पुणे :६ ऑक्टोबर २०२६.

रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगाराचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये दिली आहे.

रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी सौ. अमिताबाई हमजा शेख (वय ३७) असून त्यांचे पती हमजा उस्मान शेख (वय ३९) यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हमजा उस्मान शेख हे कोरेगाव, साईनगर, विकास नवले यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. ते मूळचे धानोरा काळे, ता. पुर्णा, जि. परभणी येथील रहिवासी होते. ते कामावर गेले असताना त्याचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात गोळी मारून त्यांचा खून केला. या घटनेनंतर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार तसेच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळ व घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सार्थक संदेश कोहकडे (वय २४, रा. कोरेगाव, ता. शिरूर), तुषार अजय तोडकर (वय २६, रा. पेठ, ता. आंबेगाव), संतोष मधुकर मांजरे (वय २७, रा. मांजरेवस्ती, ता. खेड), विठ्ठल नवनाथ पिळके (वय २७, रा. कोरेगाव, ता. खेड) आणि योगेश विलास इडोळे (वय २८, रा. शुक्रवार पेठ, वाशीम, जि. वाशीम) यांचा समावेश आहे.

चौकशीत सार्थक संदेश कोहकडे याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या विकास नवले यांच्याबाबत असलेल्या जागेच्या वादाचा राग मनात धरून हमजा उस्मान शेख यांच्या खुनासाठी आरोपी तुषार अजय तोडकर याला सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

त्यानंतर तुषार तोडकर याने पिंपरी-चिंचवड येथील सराईत गुन्हेगार संतोष मधुकर मांजरे याला विकास नवले यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष मांजरे याने त्याचा साथीदार पवन सुरेश हंडोरे याच्यासह पृथ्वी उर्फ भैय्या दत्तू जाधव, विठ्ठल नवनाथ पिळके आणि योगेश विलास इडोळे यांना सोबत घेऊन विकास नवले यांच्या पाण्याच्या प्लँटमध्ये हमजा उस्मान शेख यांच्या खुनासाठी कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी हमजा उस्मान शेख यांचा गोळी झाडून खून केला. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खुनामागील कारण, सुपारी देण्याची बाब आणि आरोपींच्या सहभागाबाबत तपास पुढे नेला. पवन सुरेश हंडोरे आणि पृथ्वी उर्फ भैय्या दत्तू जाधव यांचा शोध अद्याप सुरू असल्याचेही प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर करण्यात आले असून, सर्व अटक आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कारवाईतील प्रमुख अधिकारी

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.