पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवर मेगा ब्लॉकचा परिणाम; अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले.
पुणे : हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये सुरू असलेल्या कामाचा परिणाम शनिवार व रविवार (३ आणि ४ ऑक्टोबर) रोजी रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. या दोन दिवसांत पुणे विभागातील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्यांचा प्रवास पुण्याऐवजी खडकी, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, सातारा किंवा जेजुरी येथेच समाप्त करण्यात येणार आहे.
पुणे–नागपूर, पुणे–सोलापूर, नागपूर–पुणे, पुणे–बीड आणि अमरावती–पुणे यांसह पुणे–दौंड व पुणे–बारामती मार्गावरील काही डेमू फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी पुणे–मुंबई एक्स्प्रेससह पुणे–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, पुणे–शिर्डी, पुणे–नागपूर आणि पुणे–अमरावती या गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. पुणे–लोणावळा उपनगरीय सेवांच्या काही फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
चेन्नई–एलटीटी, पुणे–हावडा, हावडा–पुणे, निजामुद्दीन–वास्को-द-गामा आणि चंदीगड–यशवंतपूर एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या पुणे मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने धावणार आहेत. त्यामुळे काही गाड्यांना पुणे, लोणावळा, दौंड, सांगली आणि सातारा या स्थानकांवर नियोजित थांबा मिळणार नाही.
काही गाड्या खडकी, दौंडपर्यंतच
पुण्याकडे येणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास खडकी किंवा दौंड येथेच थांबवण्यात येणार आहे. इंदूर–दौंड, जोधपूर–हडपसर आणि जयपूर–पुणे एक्स्प्रेस खडकीपर्यंतच धावतील. तर सोलापूर–पुणे एक्स्प्रेस, राणी कमलापती–पुणे एक्स्प्रेस आणि बारामती–पुणे डेमूचा प्रवास दौंड येथेच समाप्त होणार आहे. हडपसर–जोधपूर एक्स्प्रेससह काही गाड्या खडकीहून सुरू करण्यात येतील.
काही गाड्या विलंबाने धावणार
पुणे–दानापूर अमृत भारत एक्स्प्रेस ३ ऑक्टोबर रोजी निर्धारित १५.२५ ऐवजी १६.०० वाजता सुटणार आहे. पुणे–दानापूर विशेष गाडी ३ ऑक्टोबरला ४ तास ५ मिनिटे, तर ४ ऑक्टोबरला ७ तास ४० मिनिटे उशिराने सुटणार आहे. हडपसर–वीरांगना लक्ष्मीबाई झाशी विशेष गाडी ४ ऑक्टोबरला अडीच तास उशिराने रवाना होणार आहे.
दरम्यान, पुणे–जम्मू तवी झेलम एक्स्प्रेस आणि पुणे–हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ३ ऑक्टोबरच्या वेळेत बदल करण्याचा पूर्वीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने रद्द केला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या निर्धारित वेळेनुसार धावणार आहेत.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळ तपासावी. रेल्वे प्रशासनाने अधिकृत रेल्वे चौकशी संकेतस्थळ किंवा NTES ॲपवर माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

