पुण्यात FDAची मोठी कारवाई; ४ ट्रक पनीर-खवा जप्त.
पुणे | शुक्रवारी पेठ ११ सप्टेंबर .
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खवा जप्त केला आहे. शुक्रवारी पेठ परिसरात करण्यात आलेल्या छापेमारीत सुमारे १० हजार किलो संशयित पनीर आणि ५ हजार किलो खवा असा मोठा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्रोताबाबत तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हा माल कर्नाटकातून पुण्यात आणला जात असल्याचा संशय आहे. या कथित कर्नाटक कनेक्शनचीही FDAकडून चौकशी केली जात आहे.
गणेशोत्सवात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी FDAने विशेष मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपासणीनंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

