Home Breaking News सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे निलंबित; कलम १५५च्या कथित गैरवापरा प्रकरणी शासनाची कारवाई.

सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे निलंबित; कलम १५५च्या कथित गैरवापरा प्रकरणी शासनाची कारवाई.

74
0

सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे निलंबित; कलम १५५च्या कथित गैरवापरा प्रकरणी शासनाची कारवाई.

सांगली | १० :सप्टेंबर 

जमिनींच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५चा कथित गैरवापर केल्याप्रकरणी सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. महसूल विभागाचे निलंबन आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

उंबरहंडे यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण तहसीलदार लीना खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागातील जमिनींच्या अभिलेखांमध्ये कलम १५५चा गैरवापर करून मालकी हक्कात बेकायदेशीर बदल केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनात पुणे विभागातील एका उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती.

दरम्यान, कलम १५५चा वापर प्रामुख्याने जमिनीच्या अभिलेखातील लिपिकीय किंवा तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी केला जातो. या तरतुदीचा वापर करून मालकी हक्कात मनमानी बदल करणे अपेक्षित नसल्याने शासनाची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पुणे विभागातील सुमारे ४० अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या बदल्या, तर ६९ अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.