Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोडी चोरटा अटकेत, २४.३० लाखांचा मुद्देमाल...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोडी चोरटा अटकेत, २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

32
0

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोडी चोरटा अटकेत, २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

 

शिक्रापूर आणि शिरूर परिसरातील ३ घरफोडी गुन्ह्यांची उकल; १६ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल हस्तगत

ठिकाण : शिक्रापूर, पुणे ग्रामीण | दिनांक : ७ सप्टेंबर २०२६

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शिक्रापूर आणि शिरूर परिसरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे आहे. 

शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळे, चोरीची वेळ आणि आरोपींची कार्यपद्धती यांचा बारकाईने अभ्यास केला. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. 

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस पथकाने अचलपूर परिसरात जाऊन आरोपी दिपक दांडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. 

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 669/2026 आणि 670/2026, तसेच शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. 708/2026 अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला गुन्हा क्रमांक 669/2026 मध्ये अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपीकडून चोरीचे सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २४ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मिळून एकूण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपी हा सराईत घरफोडी करणारा असल्याचे तपासातून समोर आले आहे. 

सध्या आरोपी शिक्रापूर पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळते का, याबाबत पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी काम केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.