धाराशिव हादरले : राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचा तीन मुलांसह दुर्दैवी अंत.

धाराशिव | ४ सप्टेंबर २०२६ :
राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून आपल्या तीन मुलांसह उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अश्विनी पौळ यांच्यासह दोन मुलांचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अश्विनी मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. किल्ल्याबाहेर त्यांनी मुलांसोबत केक कापल्याचे आणि किल्ल्यातील दुकानदारांकडून चॉकलेट घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर उपळी बुरुजाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह पोलिसांनी पाहणी केली असून विविध बाजूंनी तपास सुरू आहे.
अश्विनी यांच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
अश्विनी पौळ या महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) कार्यरत होत्या. पतीच्या सांगण्यावरून काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या.
क्रीडा क्षेत्रात अश्विनी पौळ यांची ‘महाराष्ट्राची वाघिणी’ अशी ओळख होती. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके मिळवली होती. २००७, २००८ आणि २००९ मध्येही त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
दरम्यान, या घटनेमागचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक त्रासाचे आरोप, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर सर्व बाबींचा तपास करून सत्य समोर आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.