नवी मुंबई विमानतळावर जगातील महाकाय ‘रुस्लान’चे आगमन! ४६ टन माल घेऊन अँटोनोव्ह AN-124 दाखल
नवी मुंबई | ३ सप्टेंबर २०२६ :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या अँटोनोव्ह AN-124 ‘रुस्लान’ विमानाचे प्रथमच आगमन झाले. अबुधाबीहून आलेल्या या विमानातून सुमारे ४६ टन माल नवी मुंबईत आणण्यात आला.
मॅक्सिमस एअरच्या या विमानाचे आगमन सुमारे दुपारी १२.१३ वाजता झाले. हे Code F श्रेणीतील मोठे मालवाहू विमान असून अवजड यंत्रसामग्री, मोठ्या आकाराचे साहित्य आणि विशेष मालाची वाहतूक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
AN-124 ची कमाल मालवाहतूक क्षमता सुमारे १२० टन असून, विमानाच्या पुढील भागाचा नोज उघडून मोठ्या आकाराचा माल थेट विमानात चढवता येतो. त्यामुळे पारंपरिक मालवाहू विमानांच्या तुलनेत अवजड आणि मोठ्या आकाराच्या वस्तूंची वाहतूक करणे अधिक सुलभ होते.
या विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मोठ्या व विशेष प्रकारच्या मालवाहतुकीची क्षमता अधोरेखित झाली आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सेवांचाही विस्तार सुरू असून, भविष्यात नवी मुंबई हे महत्त्वाचे हवाई मालवाहतूक केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.

