Home Breaking News हुंडाबळीच्या आरोपाने पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले; विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा.

हुंडाबळीच्या आरोपाने पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले; विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा.

47
0

हुंडाबळीच्या आरोपाने पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले; विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा.

पिंपरी-चिंचवड, २७ ऑगस्ट : वाकड परिसरातील ईशान सोसायटी येथे ४२ वर्षीय शिल्पा सचिन गवारे या विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

या प्रकरणी शिल्पा यांचे भाऊ संतोष गुलाब कलाटे यांच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी पती सचिन उत्तम गवारे, सासरे उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळाने माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. पतीकडून मारहाण होत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शिल्पा यांच्या मृत्यूबाबत माहेरच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तपासात वेगळे तथ्य आढळल्यास गुन्ह्याचे कलम बदलण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.