Home Breaking News शिरूर घरफोडी चोरीचा छडा; तिघे आरोपी जेरबंद.

शिरूर घरफोडी चोरीचा छडा; तिघे आरोपी जेरबंद.

48
0

शिरूर घरफोडी चोरीचा छडा; तिघे आरोपी जेरबंद.

शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१२ जुलै २०२६ रोजी शिरूर येथील स्टेट बँक कॉलनीमध्ये बीएसएनएल कार्यालयाचे लॉक तोडून आत प्रवेश करून बीएसएनएल कंपनीचे फ्रेम मदरबोर्ड व पीसीबी चोरीला गेले होते. तसेच वाडा कॉलनी, शिरूर येथील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुरज भिमा निंबाळकर (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), शंकर तायप्पा घोरपडे (रा. लासुर्णे वैदवाडी, ता. इंदापूर) आणि संग्राम लाला शिंदे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) यांना १५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले १२१ ग्रॅम सोन्याचे दागिने व २०० ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण १८.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, तसेच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.