कोल्हापुरात पोल्ट्री फार्मच्या आड एमडी ड्रग्जचा कारखाना; ANTF ची धडक कारवाई.

कोल्हापूर: २३ ऑगस्ट ; कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे पोल्ट्री फार्मच्या आड सुरू असलेला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज निर्मितीचा गुप्त कारखाना महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (ANTF) पुणे पथकाने उद्ध्वस्त केला. नया नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या इरफान सलीम खान याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी हाजगोळी येथील पोल्ट्री फार्मवर छापा टाकून सुमारे २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज, ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी विविध रसायने तसेच प्रयोगशाळेतील साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि ड्रग्ज निर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणेही आढळून आली. या कारवाईत मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या नाकाखाली पोल्ट्री फार्ममध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समोर आल्याने स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कारखान्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, तयार केलेले ड्रग्ज कुठे आणि कोणाला पुरवले जात होते, याचा ANTF कडून पुढील तपास सुरू आहे.


