बारामतीत बुलेट चोरांचा पर्दाफाश; ३० लाखांच्या १९ मोटारसायकली जप्त.
बारामती :१३ ऑगस्ट ; बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील काही दिवसांपासून बारामती शहर व परिसरात विशेषतः बुलेट मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी गस्त वाढवून संशयित वाहनांची तसेच संशयित आरोपींची तपासणी सुरू केली.
दरम्यान, बारामती शहर परिसरात गस्त सुरू असताना एक संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित व्यक्ती पेनसिल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने चोरीची मोटारसायकल घेऊन जात असताना पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव समाधान बाळू काळे (वय २३, रा. माणेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने रात्रीच्या वेळी बुलेटसह इतर मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळ यांसारखे लोगो लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले.
आरोपीकडून १३ बुलेट मोटारसायकली आणि ६ इतर मोटारसायकली, अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जप्त वाहनांमध्ये MH 42 BK 3003, MH 42 AV 2121, MH 42 BK 0749, MH 42 BK 9709, MH 42 BD 9490, MH 42 AT 5455, MH 42 AZ 0374, MH 42 AZ 1616, MH 42 AB 1212, MH 42 TG 2677, MH 42 AV 7869, MH 42 UQ 0303 आणि MH 42 EA 9977 या १३ बुलेटचा समावेश आहे. याशिवाय आणखी ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे बारामती शहर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे बारामती परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून चोरीच्या आणखी घटनांचा तपास लागण्याची शक्यता आहे.
