Home Breaking News तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर पुन्हा प्रहार; अक्कलकोटमध्ये FDAची धडक कारवाई.

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर पुन्हा प्रहार; अक्कलकोटमध्ये FDAची धडक कारवाई.

39
0

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर पुन्हा प्रहार; अक्कलकोटमध्ये FDAची धडक कारवाई.

अक्कलकोट :१ जुलै: राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. शिर्डीतील धडक कारवाईनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा अक्कलकोट येथे वळवला आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरातील मिठाई दुकानांवर अचानक छापेमारी करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान मंदिर परिसरातील 23 मिठाई दुकानांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संशयास्पद वाटलेल्या बर्फी, पेढे आणि इतर मिठाईचे नमुने अधिकाऱ्यांनी जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित मिठाई निकृष्ट, भेसळयुक्त किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारी आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवर प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांबाबत भाविकांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे अशा ठिकाणी भेसळयुक्त, मुदतबाह्य किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणे हा केवळ कायद्याचा भंग नसून भाविकांच्या श्रद्धेशी आणि त्यांच्या आरोग्याशी केलेला गंभीर विश्वासघात आहे.

यापूर्वीही तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, शिर्डी आणि राज्यातील विविध भागांमध्ये हॉटेल्स, बेकऱ्या, मिठाई दुकाने व इतर खाद्य व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात धडक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्या कारवायांमध्ये अनेक ठिकाणी अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाले होते.

अक्कलकोटमधील या कारवाईमुळे मिठाई विक्रेते आणि खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषी आढळणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.