पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवात.

सांख्यिकीय माहिती राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त-आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार.
पुणे, दि. 5: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागाच्यावतीने प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयुएसई) या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी पुणे व कोकण विभागातील नियुक्त केलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षकांची आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक डॉ. रुही कुलकर्णी, मुंबई मुख्य कार्यालयाचे सहआयुक्त भीष्म बिरादार, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त (नियोजन) संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उप आयुक्त प्रियांका बोकोल, सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपराणी, इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लि. संचालक तृप्ती शर्मा उपस्थित होते.
विकसित भारत @ 2047 नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरिता जिल्हास्तरीय रोजगार-बेरोजगार आकडेवारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या तसेच रोजगार निर्मिती आदी निर्देशकांची सविस्तर सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे. ‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’हे दोन्ही सवेक्षण एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येत आहे. या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या निर्देशकांद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त होईल. शासनाच्या विविध योजना आखण्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणांचे अनन्य साधारण महत्त्व आहे, असेही डॉ. पडियार म्हणाल्या.
कार्यक्रमात ‘पीएलएफएस’ व ‘एएसयुएसई’ही महत्वाची सर्वेक्षणे असून या सर्वेक्षणामधून प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर, जिल्हा आणि विभागस्तरावरील कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रगणकांनी आकडेवारी गोळा करतांना दक्षता घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी चित्रफीतद्वारे केले.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, विकसित भारत @2047 चे ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती अत्यावश्यक आहे. तसेच ‘एव्हिडन्स बेस्ड डेटा’ चा उपयोग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास उपयोग होतो. त्यामुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणापूरती मर्यादित नसून या दोन्ही सर्वेक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक मजबूत पाया घालणारी महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, असेही त्या म्हणाल्या.
श्री टोपराणी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मोजमापामध्ये या दोन्ही सर्वेक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असलयाचे मत व्यक्त केले.
पाचदिवशीय ( 5 ते 10 जून) या प्रशिक्षण सत्रात इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लि. मुंबई या बाह्यसंस्थेकडून नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना पीएलएफएस सर्वेक्षणांतर्गत रोजगार बेरोजगारीची स्थिती, कामगार सहभाग दर, उद्योग व व्यवसायनिहाय रोजगाराची रचना याबाबत तसेच एएसयुएसई सर्वेक्षणांतर्गत असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, स्वरुप, आर्थिक स्थिती, रोजगारनिर्मितो व उत्पन्न खर्च यासंबंधी माहिती संकलनाच्या संकल्पना, व्याख्या व कॅपी तंत्रज्ञानाद्वारे टॅबलेटवर माहिती नोंदणीचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यामध्ये पीएलएफएस आणि एएसयुएसई सर्वेक्षणांतर्गत एकूण 6 हजार 828 इतक्या नमुना घटक असून 276 अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे व कोकण विभागात पीएलएफएस आणि एएसयुएसई या दोन्ही सर्वेक्षणांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 2 हजार 956 नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे व हे सर्वेक्षण 75 अन्वेषक आणि 28 पर्यवेक्षक यांच्या पथकाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहआयुक्त जयसिंग मेहेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्र.सह आयुक्त वृषाली माकर यांनी केले.