पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू! मोर्चे, आंदोलने, शस्त्रे आणि आक्षेपार्ह घोषणांवर बंदी.

पुणे :२५ मे २०२६, पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती महागाई आणि विविध संघटनांकडून होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात मंगळवार, २६ मे २०२६ च्या रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या आदेशांमुळे शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुका किंवा सार्वजनिक जमाव करण्यास बंदी असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
आदेशात नेमकं काय?
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील १४ दिवस शहरात खालील गोष्टींवर कडक निर्बंध असतील:
मोर्चे आणि सभा बंद:
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, सार्वजनिक सभा घेणे, मोर्चे काढणे किंवा मिरवणुका आयोजित करण्यास बंदी असेल.
शस्त्रे बाळगण्यास मनाई:
तलवार, भाला, लाठी, काठी, बंदूक किंवा इजा पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
ज्वलनशील पदार्थांवर निर्बंध:
दगड साठवणे, क्षेपणास्त्रे किंवा अस्त्रे तयार करणे, तसेच दाहक, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यावर बंदी असेल.
आक्षेपार्ह घोषणा व प्रतिमा दहनास बंदी:
चिथावणीखोर घोषणा देणे, भडकावू गाणी किंवा वाद्ये वाजवणे तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमेचे किंवा पुतळ्याचे दहन करण्यास मनाई असेल.
आक्षेपार्ह फलकांवर कारवाई:
सार्वजनिक शांतता भंग करणारे चित्र, फलक किंवा चिन्हे वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नियम तोडल्यास थेट गुन्हा
पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी आढळणारी शस्त्रे किंवा धोकादायक वस्तू पोलिसांकडून जप्त केल्या जातील.
पोलिस यंत्रणा सतर्क
आगामी सण, इंधन दरवाढीविरोधातील आंदोलनांची शक्यता आणि शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढवला आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचाच आधार घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे।
