Home Breaking News आंबा घाटात भीषण अपघात; एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक, पाच...

आंबा घाटात भीषण अपघात; एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक, पाच जण जखमी.

52
0

आंबा घाटात भीषण अपघात; एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक, पाच जण जखमी.

रत्नागिरी : २१ मे २०२६ ; रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी सकाळी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात घडला. दक्खन बस थांब्याजवळ एसटी बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एसटी चालकासह एकूण पाच जण जखमी झाले असून परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खडीकोळवण ते साखरपा मार्गावर धावणारी एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) चालवत होते. त्याचवेळी रत्नागिरीहून साताऱ्याकडे जाणारी एर्टिगा कार (एमएच ११ डीझेड ०३२९) दक्खन बस थांब्याजवळ आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे गंभीर जखमी झाले. तसेच एसटीमधील प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण) हेही जखमी झाले आहेत. एर्टिगा कारमधील संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा), शंभुराज शिवाजी पवार (वय १३) आणि श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी-ठाणे) यांनाही दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, घाटातील वळणदार रस्ता आणि वाहनांचा वेग यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण काय याचा तपास साखरपा पोलीस करत आहेत.