Home Breaking News नसरापूरमध्ये चिमुकलीवरअत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचा विकृत भूतकाळ उघड.

नसरापूरमध्ये चिमुकलीवरअत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचा विकृत भूतकाळ उघड.

48
0

नसरापूरमध्ये चिमुकलीवरअत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचा विकृत भूतकाळ उघड.

पुणे:पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. महाराष्ट्र दिनी एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याचा भयानक आणि विकृत भूतकाळ समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

आरोपी मूळचा साळवडे गावचा असून, महिलांशी गैरवर्तन आणि विनयभंगाच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी त्याला सुमारे २० वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले होते. त्याच्यावर त्या काळात गुन्हेही दाखल झाले होते. गावबंदी झाल्यानंतर तो नसरापूर परिसरात राहत होता आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत होता.

घटनेच्या दिवशी पीडित मुलगी मंदिर परिसरात खेळत असताना आरोपीने तिला आमिष दाखवून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून खून केला. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत आरोपी स्वतः गावकऱ्यांसोबत सहभागी झाला होता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा उलगडा करण्यात बॅटरीवर चालणाऱ्या CCTV कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका ठरली. वीजपुरवठा खंडित असतानाही एका घरातील कॅमेरा सुरू होता आणि त्यात आरोपीची हालचाल कैद झाली.

या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.