Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी – दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी – दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद,५ आरोपींना अटक.

67
0

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी – दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद,५ आरोपींना अटक.

पुणे ग्रामीण पोलीस दलाने दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून मोटारसायकली, सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये कुख्यात दरोडेखोर योगेश ईश्वर भोसले व त्याच्या टोळीतील सदस्य यांना अटक केली आहे.

ही कारवाई दौंड पोलीस स्टेशन हद्दीत नोंद झालेल्या गुन्हा क्रमांक 435/2025 (भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 310(2), 351(2) इ.) च्या तपासादरम्यान करण्यात आली. दिनांक 19 जून 2025 रोजी फिर्यादी कुंदन वाघमारे यांच्या तक्रारीनुसार, पांढरकवडी परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांना अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली होती.

घटनेनंतर दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच इतर पोलीस यंत्रणांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी अहमदनगर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा व इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ५ मोटारसायकली, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी विविध ठिकाणी दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार  व इतर अधिकाऱ्यांनी समन्वय साधून विशेष पथक तयार केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.