दिंडोरी अपघातास कारणीभूत रस्त्याच्या मधोमधील विहीर ,सिमेंट रस्त्याची विहिरीपर्यंतची धोकादायक बांधणी ९ जणांच्या जीवावर बेतली!
दिंडोरी तालुक्यात ३ एप्रिलला अत्यंत मन हेलावून टाकणारी घटन घडली. दिंडोरी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एक कार वाहनचालकाला अंदाज न आल्याने जाऊन पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी रस्ता बनवताना विहिरीच्या सुरक्षिततेकडे केलेले दुर्लक्ष आणि सिमेंट रस्त्याची विहिरीपर्यंतची धोकादायक बांधणी आज नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
कॉलनीतील सिमेंट रस्त्याच्या मधोमध असलेली खोल जुनी विहीर. पलीकडे काही अंतर सोडून पुढे पुन्हा रस्ता. एका बाजूचा रस्ता अगदी विहिरीपर्यंत भिडलेला. विहिरीचा एक फूटपेक्षा कमी उंचीचा कठडाही सिमेंटचाच. रस्ता आणि कठड्याच्या उंचीत फारसा फरक नाही. या ठिकाणी धोकादायक स्थितीचा माहिती फलक देखील नाही. सिमेंटचा रस्ता थेट विहिरीपर्यंत भिडत असल्याने रात्री कुणाला समोरील धोक्याचा अंदाज देखील येणार नाही. ही बाब शुक्रवारी रात्री दिंडोरीतील भीषण अपघाताचे कारण ठरले.
नगरपरिषदेने जेव्हा हा रस्ता बनवला तेव्हा प्रशासकीय लोकांनी विहीर मालक याला सदर विहीर बुजविण्यासाठी नोटीस बजावली पाहिजे होती. त्याला सूचना करायला पाहिजे होत्या, किंवा त्याच्याकडून गांभीर्याने या विहिरीवरती संरक्षक जाळी बसवून घेतली असती तर कदाचित हा अपघात घडला नसता.
दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात मोटार विहिरीत पडून एकाच कुटुंबातील सहा शालेय विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. शिवाजीनगर हा निवासी वसाहतीचा परिसर असून याच ठिकाणी राजे बॅक्वेट हॉल व मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असून यातील पुढील प्रवेशद्वाराने थेट बाहेर निघून जाता येते. कॉलनी रस्त्यातील धोकादायक विहीर लागत नाही.
कार्यक्रमास आलेली वाहने त्याच प्रवेशद्वारातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. सुनील दरगोडे हे कार्यालयाच्या मागील दरवाजाने मोटार घेऊन निघाले आणि भरधाव वेगात त्यांचे वाहन कॉलनी रस्त्यातील विहिरीत कोसळले. रात्री दहा ते साडेदहा वाजता ही घटना घडली.
