डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर एकच नाव… आदरणीय अजितदादा पवार! पवनानगर परिसरात आज भावनिक वातावरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत पूजन करून राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहाटेपासूनच पवनानगर परिसरात नागरिकांची, कार्यकर्त्यांची आणि शेकडो ग्रामस्थांची गर्दी उसळली होती. दादांच्या अस्थींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तरुण, ज्येष्ठ, महिला, शेतकरी, कामगार अशा सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर हातात दादांचे फोटो आणि पक्षाचे झेंडे दिसत होते. संपूर्ण परिसर ‘अजितदादा अमर राहो’ या घोषणांनी दुमदुमून गेला.
विधीवत पूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी दादांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा उजाळा दिला. वक्त्यांनी सांगितले की, अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व होते. मावळ, पवनानगर आणि परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन प्रकल्प, शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांनी कायमस्वरूपी स्थान मिळवले होते.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, “दादांच्या एका शब्दासाठी आम्ही जीवाचे रान करायचो. त्यांचे मार्गदर्शन, पाठबळ आणि मायेचा हात कायम लक्षात राहील.” अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या आठवणी सांगताना भावना अनावर झाल्या. “दादा आमच्यासाठी कुटुंबातील व्यक्तीसारखे होते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
आजच्या शोकसभेला जमलेली अफाट गर्दी ही दादांनी आयुष्यभर कमावलेल्या माणुसकीची साक्ष असल्याचे मत मावळ मतदारसंघाचे आमदार श्री. सुनील शेळके यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करू. विकासाचा मार्ग थांबणार नाही.”
कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पक्ष पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अस्थिकलश पूजनानंतर सामूहिक प्रार्थना करून दिवंगत आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
दादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे निधन नसून जनतेचा आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्यातूनच पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.