Home Breaking News धाराशिवमध्ये शिवसेनेला बळकटी; भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश

धाराशिवमध्ये शिवसेनेला बळकटी; भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश

70
0
धाराशिव | प्रतिनिधी :- धाराशिव तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपाला मोठा धक्का देत धाराशिव तालुका कार्यकारणी सदस्य तथा चिलवडी गावचे माजी उपसरपंच अजित सावंत आणि संतोष राजगुरू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे चिलवडी गावासह संपूर्ण तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर तसेच सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने झटणाऱ्या शिवसेनेच्या सेवाभावी भूमिकेवर विश्वास ठेवून अजित सावंत व संतोष राजगुरू यांनी शिवसेना परिवारात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी आणि लोकहिताला प्राधान्य देणारी शिवसेनाच खरी लोकांची पार्टी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रवेशप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर आणि तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांच्या उपस्थितीत नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांचे शिवसेना परिवारात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत, पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रवेशामुळे चिलवडी गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळणार असून, गावपातळीवर संघटन अधिक भक्कम होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख सौदागर जगताप, विभागप्रमुख अमोल मुळे, शौकत शेख, किरण बोचरे, ग्रामपंचायत सदस्य बाबा कोळी, अनंत जाधव, गणप्रमुख बालाजी जाधव, राजेंद्र जाधव, आबासाहेब माळी, कृष्णा जाधव, सुधीर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.