जम्मू | प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या तीव्र हिमवृष्टीमुळे जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या मार्गावर बर्फ साचणे, दरड कोसळणे आणि दगड घसरल्याच्या घटनांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने सोमवार सायंकाळपासून मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः उंचावरील भागांमध्ये तापमान शून्याच्या खाली घसरले असून, थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. श्रीनगर, अनंतनाग, कुलगाम आणि गांदरबल या चार जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा (एवलांच) गंभीर धोका असल्याची चेतावणी देण्यात आली आहे.
या प्रतिकूल हवामानाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला असून, काश्मीरला ये-जा करणाऱ्या चार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सीमा रस्ते संघटना (BRO), पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके महामार्गावरून बर्फ हटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. मात्र, सतत सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे हे काम आव्हानात्मक ठरत आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क असून, परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.
हवामान सुधारल्यानंतरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तोपर्यंत काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.