Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८व्या कॉमनवेल्थ स्पीकर्स परिषदेला भव्य प्रारंभ; ४२...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८व्या कॉमनवेल्थ स्पीकर्स परिषदेला भव्य प्रारंभ; ४२ देशांतील ६१ प्रतिनिधींचा सहभाग

32
0
नवी दिल्ली : संसद परिसरातील ऐतिहासिक संविधान सदनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८व्या कॉमनवेल्थ स्पीकर्स आणि प्रेसायडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स (CSPOC) चे उद्घाटन करण्यात आले. जगभरातील ४२ देशांमधून आलेले ६१ सभापती, उपसभापती व संसदीय अधिकारी या परिषदेत सहभागी झाले असून, लोकशाही मूल्ये, संसदीय परंपरा आणि जागतिक सहकार्य यावर सखोल चर्चा होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण ज्या ठिकाणी बसले आहात, ते भारताच्या लोकशाही प्रवासातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे. गुलामीच्या अखेरच्या काळात, भारताच्या स्वातंत्र्याची दिशा निश्चित होत असताना याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेच्या बैठकांद्वारे आपल्या संविधानाची निर्मिती झाली. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षे हीच इमारत भारताची संसद राहिली. याच सभागृहात देशाच्या भविष्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.”
लोकशाहीला समर्पित असलेल्या या वास्तूला ‘संविधान सदन’ असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या लोकशाही परंपरेचे हे जिवंत प्रतीक असल्याचे नमूद करत, लोकशाही केवळ शासनपद्धती नसून ती मूल्यांची, संवादाची आणि सहभागाची संस्कृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या परिषदेमुळे कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील संसदीय सहकार्य अधिक दृढ होणार असून, आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लोकशाही संस्था अधिक सक्षम कशा करता येतील, यावर मार्गदर्शन मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता, युवकांचा सहभाग आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन हे या परिषदेचे प्रमुख विषय आहेत.
भारताने लोकशाहीच्या प्रवासात मिळवलेला अनुभव संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदींनी “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेवर आधारित समावेशक विकास आणि शांततेचा संदेश जगाला देण्याचा भारताचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला.