Home Breaking News मोठ्या कंपनीचा विचार नाही, तुकाराम मुंढेंची सिप्ला कंपनीवर मोठी कारवाई; वाडकीतील गोदामाचा...

मोठ्या कंपनीचा विचार नाही, तुकाराम मुंढेंची सिप्ला कंपनीवर मोठी कारवाई; वाडकीतील गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द

21
0

 मोठ्या कंपनीचा विचार नाही, तुकाराम मुंढेंची सिप्ला कंपनीवर मोठी कारवाई; वाडकीतील गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द.

पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वाडकी येथील गोदामावर मोठी कारवाई केली आहे. औषधांच्या चुकीच्या लेबलिंगसह साठवणूक, स्वच्छता आणि आवश्यक नोंदींबाबत नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर कंपनीचा औषध विक्री व वितरण परवाना रद्द करण्यात आला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या देखरेखीखाली तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली.

FDAच्या तपासणीत ‘रिॲक्टिन प्लस’ या औषधाच्या लेबलिंगबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. हे औषध ‘Schedule H’ अंतर्गत येत असल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याची विक्री करता येत नाही. मात्र, औषधाच्या पॅकेजिंगवर डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, मुरगळणे, अंगदुखी आणि दातदुखीपासून त्वरित आराम मिळतो, असे दावे करण्यात आल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले.

तपासणीदरम्यान गोदामातील औषध साठवणुकीच्या व्यवस्थेबाबतही नियमभंग आढळला. काही औषधांचे कंटेनर थेट जमिनीवर ठेवलेले आणि धुळीने माखलेले आढळले. तसेच अनिवार्य इन्स्पेक्शन बुक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मुदत संपलेल्या औषधांसाठी ‘Not for Sale’ असा स्वतंत्र विभाग किंवा योग्य व्यवस्था नसल्याचेही अधिकाऱ्यांनी नोंदवले.

याशिवाय, काही औषधांच्या प्रत्यक्ष साठ्यात आणि संगणकीय नोंदींमध्ये तफावत आढळली. यामध्ये काही अँटिबायोटिक्सचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. FDAने कंपनीकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण स्वीकारले नाही. डिजिटल नोंदी ठेवल्या असल्या तरी प्रत्यक्ष साठवणूक, स्वच्छता आणि आवश्यक कायदेशीर कागदपत्रांच्या नियमांचे पालन करण्यापासून सूट मिळत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.

सविस्तर सुनावणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत १ ऑक्टोबर रोजी परवाना रद्द करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, विभागाचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून औषध पुरवठा साखळीत सुरक्षितता, गुणवत्ता आणि कायदेशीर नियमांचे पालन सुनिश्चित करणे हा आहे. संबंधित प्रकरणातील निर्णय हा सुनावणी, पारदर्शकता, न्याय आणि तर्कशुद्ध प्रक्रियेच्या आधारे घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य मुद्दे :

सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसच्या वाडकी गोदामावर FDAची कारवाई.

औषध विक्री व वितरणाचा परवाना रद्द.

‘रिॲक्टिन प्लस’च्या लेबलिंगवर आक्षेप.

औषध साठवणूक व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन.

मुदतबाह्य औषधांसाठी स्वतंत्र ‘Not for Sale’ व्यवस्था नसल्याचे आढळले.

प्रत्यक्ष औषधसाठा आणि संगणकीय नोंदींमध्ये तफावत

१ ऑक्टोबरला परवाना रद्द करण्याचा अंतिम आदेश.