Home Breaking News शाळा दुरुस्तीचा निधी आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर; दादा भुसे यांची मोठी घोषणा

शाळा दुरुस्तीचा निधी आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर; दादा भुसे यांची मोठी घोषणा

43
0

 शाळा दुरुस्तीचा निधी आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर; दादा भुसे यांची मोठी घोषणा

नाशिक : १९ सप्टेंबर २०२६

जिल्हा परिषद शाळांमधील किरकोळ दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी आता दुरुस्तीचा निधी थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रशासकीय मंजुरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री दादा भुसे बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १५ गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

शाळांमध्ये रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने करता यावीत, यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊनच मुख्याध्यापकांनी या निधीचा वापर करावा, असे आवाहनही भुसे यांनी केले.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थी पटसंख्या आणि मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण याबाबतही दादा भुसे यांनी चिंता व्यक्त केली. पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासनाने सध्याच्या प्रयत्नांपेक्षा किमान २५ टक्के अधिक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शाळा केवळ सुरू ठेवणे किंवा बंद पडण्यापासून वाचवणे हा उद्देश नसून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगले संस्कार आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे आणि आपल्या परिसरातील शाळा आदर्श शाळा बनवण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन दादा भुसे यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

🏆 गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक :

बागलाण: माधुरी सुभाष पवार,चांदवड: सतीश भाऊसाहेब अहिरे ,देवळा: सतीश गोविंदराव आहेर,दिंडोरी: भिलाजी माधवराव पाटील,इगतपुरी: अवधूत रामदास खाडगीर,कळवण: सविता तानाजी भामरे,मालेगाव: मीना निशा देवरे,नांदगाव: गणेश पुंडलिक साळी,नाशिक: विवेक पुंडलिक खैरनार,निफाड: गौरी राजेंद्र गायवन,पेठ: योगेंद्र गणपत बोरसे,सिन्नर: प्रकाश दत्तू जगताप,सुरगाणा: सुधाकर कृष्णा भोये, त्र्यंबकेश्वर: संदीप दत्तात्रय गुंजाळ,,येवला: योगेश बाळासाहेब माकोण