पुण्यातील कोंढव्यात थरार! फक्त २ हजारांसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला.
पुणे:कोंढवा १४ सप्टेंबर.
पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरात अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि क्रूर मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. क्षुल्लक २ हजार रुपयांच्या मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन सराईत गुंडांनी एका तरुण कपडे व्यावसायिकावर अत्यंत निर्घृणपणे जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगरातील भगवा चौकात घडली. साई मेडिकलसमोर २२ वर्षीय तरुण व्यावसायिक प्रणव मल्हारी पवार हा उभा असताना, त्याच्या ओळखीचे अरबाज शेख आणि अब्रार खान तेथे आले. अरबाजने प्रणवकडे २,००० रुपयां अचानक मागितले. प्रणवने पैसे देण्यास असमर्थता दर्शवत नकार दिला, ज्यामुळे संतापलेल्या दोघांनी भररस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रणव तिथे असलेला वाद टाळून निघून जाऊ लागला असता, अब्रारने मागून त्याच्या डोक्यात जोरदार ठोसा मारला.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी प्रणवला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही; अरबाजने लागलीच जवळच्या एका चहाच्या टपरीवरून जड लोखंडी वस्तू उचलून आणली आणि थेट प्रणवच्या डोक्यात घातली. डोक्यातून रक्ताच्या थारोळ्या वाहू लागल्या तरी या गुंडांची दया आली नाही. त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या प्रणवला फरफटत शेजारच्या झेरॉक्स दुकानात नेले आणि तेथे ठेवलेली अत्यंत जड लोखंडी कचरापेटी उचलून त्याच्या अंगावर आणि डोक्यात सपासप मारली.
या भीषण आणि अमानुष हल्ल्यातून प्रणवने कसातरी स्वतःचा बचाव करत तिथून पळ काढला आणि भावाला फोन करून आपबिती सांगितली. गंभीर जखमी अवस्थेत भावाने त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

