पुण्यात दहीहंडीतील लावणीचा कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा
पुणे | बिबवेवाडी ,७ सप्टेंबर .
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित लावणी कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दहीहंडी कार्यक्रमात अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्य होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधित कलाकारांकडून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली होती. मात्र, आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर न झाल्याने पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या पाहणीदरम्यान कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. कार्यक्रमातील काही नृत्यहावभाव आक्षेपार्ह असल्याची टीकाही सोशल मीडियावर झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. सार्वजनिक उत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
