Home Breaking News कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग; उद्यानपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग; उद्यानपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

31
0

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग; उद्यानपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

पुणे : २९ सप्टेंबर २०२६

कात्रज-कोंढवा रस्ता तसेच कात्रज चौकातील उद्यानपुलाच्या विकासकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी राजम सोसायटीजवळील पूर्ण झालेल्या सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्रुती नाईक यांनी उद्यानपुलाचे काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच कात्रज-कोंढवा रस्ता विकासासाठी आवश्यक असलेल्या आणि भूसंपादनातून वगळण्यात आलेल्या १० मिळकतींचा आढावा उपआयुक्त व भूसंपादन विभागाचे अधिकारी श्री. मोरे यांनी घेतला. संयुक्त मोजणी सुरू असून क्षेत्रफळ निश्चित झाल्यानंतर संबंधित जागामालकांकडून संमती घेऊन रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

संबंधित जागामालकांशी चर्चा करून लवकरात लवकर कामासाठी जागा उपलब्ध करून घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. यावेळी चिदानंद सोसायटीचे चेअरमन यांच्याशी जागेवर रस्ता विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून ग्रेड सेपरेटर पूल उभारणीसाठी अडथळा ठरणारे विद्युत पोल व जागेबाबतची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली. ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी रस्त्यावरील पोल व ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविण्याच्या सूचना मुख्य अभियंता (विद्युत विभाग) श्रीमती शेखकर यांना देण्यात आल्या.

महापालिका आयुक्तांनी ५० मीटर रुंदीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना अवगत केले. तसेच ८४ मीटर रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही व तरतूद उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ८४ मीटर विकासासाठी मार्च २०२८ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

पाहणीदरम्यान मुख्य अभियंता पथ विभागाचे श्री. बनकर, उपआयुक्त श्री. निखील मोरे, मुख्य अभियंता (विद्युत विभाग) श्रीमती शेखकर तसेच महापालिका व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.