Home Breaking News हडपसर दारूकांडातील आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी घेतले ताब्यात.

हडपसर दारूकांडातील आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी घेतले ताब्यात.

71
0

हडपसर दारूकांडातील आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी घेतले ताब्यात.

 

उरुळी कांचन : हडपसर दारूकांडातील पाहिजे असलेला आरोपी दत्ता उर्फ भावड्या भिमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. हडपसर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ३७९/२०२६ आणि दापोडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ११४/२०२६ मधील भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२३ आणि १२५ अन्वये हा आरोपी पोलिसांना पाहिजे होता.

या गुन्ह्यात पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा बळी गेला होता. या गंभीर प्रकरणातील सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या लोंढे हा पोलिसांना चकवा देत फरार होता. तो शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात वेशांतर करून आणि रूप बदलून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, सी.आय.डी. पुणे घटकचे पोलीस अधीक्षक शफकत अमना, पुणे ग्रामीण सी.आय.डी.चे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाला आरोपी राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे वेशांतर करून व रूप बदलून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर तो गाडीची नंबरप्लेट बदलून त्या ठिकाणाहून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीची ओळख पटवून त्याला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उरुळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, पुढील तपासासाठी आरोपीला सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ शिंदे, सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस हवालदार कमलेश होळे, पोलीस शिपाई अक्षय कामठे, पोलीस शिपाई ऋषिकेश रासकर, पोलीस शिपाई संजय दापणे आणि पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर यांनी सहभाग घेतला.

पोलिसांच्या गोपनीय माहिती, सतर्कता आणि तातडीच्या कारवाईमुळे वेशांतर करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले. या कारवाईमुळे हडपसर दारूकांडातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.