शिरूरमध्ये एमडी ड्रग्जवर पोलिसांची मोठी कारवाई; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

शिरूर : पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत शिरूर परिसरात मोठी कारवाई करत **११० ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित एमडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अमली पदार्थ, मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत राजवाडा चौक येथे एमडी अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचला. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.१० वाजता पोलिसांनी छापा टाकून सुरेंद्रसिंग भैरुसिंग राठोड ऊर्फ राजपूत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिश्नोई (वय ३१) यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी सध्या शिरूर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपींकडून ११० ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४४/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
