संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावर 13 ते 24 जुलैदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

Pune: 7 जुलै ;पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर पुणे–पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग (NH-965) तसेच पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी विशेष वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
13 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत जेजुरी, मोरगाव, बारामती, लोणंद, फलटण, सातारा आदी मार्गांवर विविध ठिकाणी सर्वसाधारण वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून, जड वाहतूक तसेच इतर वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
आदेशानुसार जेजुरी, मोरगाव, पारगाव, वाल्हे, शिवरी, बेलसर, सासवड आणि लोणंद परिसरातील प्रमुख चौकांवर वेळेनुसार वाहतूक वळविण्यात येईल. पुणे, सातारा, फलटण, बारामती आणि सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी मार्गावर लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने कोणताही अपघात अथवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त नियोजन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक सल्ला तपासूनच प्रवास करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.