Home Breaking News राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून कारगिल वीरांना मानवंदना.

30
0

राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून कारगिल वीरांना मानवंदना.

मुंबई : २७ जुलै :कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करत वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक आणि दिव्यांग सैनिकांचा सन्मान केला. यावेळी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार भारतीय सैन्यदल, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली. सैनिकांच्या कल्याणासाठी आवश्यक त्या सर्व योजना आणि सुविधा प्रभावीपणे राबविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजय दिवस हा केवळ युद्धातील विजयाचा उत्सव नसून भारतीय जवानांच्या अदम्य शौर्य, त्याग, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. वीरमाता आणि वीरपत्नींचा त्याग देश कधीही विसरणार नाही, असे नमूद करत त्यांनी कारगिल युद्धभूमीवरील अनुभव आणि शहीद जवानांनी कुटुंबीयांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केला. कारगिलच्या शौर्यगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कारगिल वॉर मेमोरियल येथे लाईट अँड साऊंड शोसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे आणि देशाच्या सुरक्षा धोरणाचे त्यांनी कौतुक केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी 1999 च्या कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांचे शौर्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभला असून राज्यातील अनेक जवानांनी कारगिलमध्ये सर्वोच्च बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक आणि दिव्यांग सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या बँडचे सादरीकरण, देशभक्तीपर गीत तसेच तिन्ही सैन्यदलांचे दृकश्राव्य सादरीकरण झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कारगिल युद्धातील शौर्य पुरस्कार विजेते, वीरमाता, वीरपत्नी आणि दिव्यांग सैनिक अशा एकूण 39 जणांचा सन्मान करण्यात आला. भारतीय नौदल बँडला रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच कवी प्रदीप यांच्या देशभक्तीपर रचनेच्या निर्मिती आणि प्रकाशनाशी संबंधित स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांचा गौरव करून देशभक्तीपर गीताचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.