Home Breaking News पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा यशस्वी; केंद्र सरकारसमोर मांडला...

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा यशस्वी; केंद्र सरकारसमोर मांडला विकासाचा रोडमॅप.

22
0

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा यशस्वी; केंद्र सरकारसमोर मांडला विकासाचा रोडमॅप.

रेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा.

दि.२४ जुलै २०२६:-नवी दिल्ली / पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासासाठी महापौर रवि लांडगे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्र सरकारसमोर शहराशी संबंधित महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडत विकासाचा व्यापक रोडमॅप सादर केला. नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळावा, शहराला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि भविष्यातील विकास प्रकल्पांना गती मिळावी, या उद्देशाने त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रत्येक बैठकीत शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या ठोसपणे मांडत त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणीला गती देण्याची मागणी करण्यात आली. 

महापौर श्री. लांडगे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवडमधील रेड झोनचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला. संरक्षण विभागाच्या निर्बंधांमुळे शहरातील लाखो नागरिकांना बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, मालमत्ता व्यवहार, बँक कर्जे तसेच विविध विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या प्रश्नावर संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, संरक्षण प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीद्वारे नागरिकांना दिलासा देणारा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष पिंपरी-चिंचवड शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निमंत्रणही देण्यात आले. 

यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) आठपदरीकरणासाठी प्रलंबित भूमी संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पाच्या कामास गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास कायम ठेवण्यात यावा आणि मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे महापौरांनी नमूद केले. 

केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबतच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये “मेयर्स कप” ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच शहरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन, Khelo India आणि Fit India अभियानांतर्गत सहकार्य तसेच आवश्यक आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शहरातील युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. 

याच दौऱ्यात केंद्रीय एमएसएमई मंत्री मा. श्री. जितराम मांझी यांचे प्रमुख सल्लागार श्री. संदीप पोखरकर यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महिला औद्योगिक क्लस्टर उभारण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे, महिलांना उद्योग-व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध व्हाव्यात, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष निधी, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महिला सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने एमएसएमई मंत्रालयाने विशेष सहकार्य करावे, अशी मागणीही महापौरांनी यावेळी केली. 

या सर्व बैठकींमध्ये पिंपरी-चिंचवड शहराला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, वाढत्या लोकसंख्येला आणि औद्योगिक विस्ताराला पूरक अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष सहकार्य मिळावे तसेच शहराच्या विकासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावेत, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी ठामपणे मांडली. 

महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा विषय केंद्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी आहे. दिल्लीतील सर्व बैठकींमध्ये केंद्र सरकारच्या मान्यवर मंत्र्यांनी आमच्या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या असून शहराच्या हिताच्या विषयांवर अनुकूल निर्णय होतील, असा मला ठाम विश्वास आहे. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी माझा हा पाठपुरावा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.”