वर्षभर सोनं खरेदी करू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासियांना 9 महत्त्वाची आवाहने, पेट्रोल-डिझेल वापराबाबतही दिला सल्ल.

New Delhi: १० मे २०२६:पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन, परकीय चलन आणि संसाधनांची बचत करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे ₹9,377 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर केवळ गरजेनुसार करण्याचा सल्ला दिला.
मोदी म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांचा संयमाने वापर केल्यास परकीय चलनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल आणि जागतिक संघर्षांमुळे होणारे आर्थिक परिणामही कमी करता येतील. त्यांनी नागरिकांना जीवनशैलीत काही बदल करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींची 9 प्रमुख आवाहने:
पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा.
खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवा.
पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा.
वर्षभर अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
कच्च्या तेलाची बचत करण्यावर भर द्या.
परकीय चलन साठा टिकवून ठेवा.
मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करा.
वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन बैठका वाढवा.
परकीय उत्पादनांची खरेदी कमी करून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या.
पर्यायी ऊर्जेवर सरकारचा भर
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत सौर ऊर्जा, इथेनॉल मिश्रण, सीएनजी आणि पीएनजी यांसारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक घरापर्यंत एलपीजी पोहोचवल्यानंतर आता परवडणाऱ्या पाईप गॅसचा पुरवठा वाढवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे.
तेलंगणात ₹9,377 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
या दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग 167 चे चौपदरीकरण, हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉर, जहीराबाद औद्योगिक क्षेत्र, रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प, ग्रीनफिल्ड पेट्रोलियम टर्मिनल आणि वारंगलमधील पीएम मित्र टेक्सटाईल पार्क यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने संसाधनांचा वापर करून देशाची आर्थिक ताकद वाढवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.