लातूर : शिक्षण क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे, लातूर शैक्षणिक पॅटर्नचे जनक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत Dr. Janardan Waghmare यांच्या पार्थिवावर आज सकाळी लातूर जिल्ह्यातील कवठा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
खासदार, कुलगुरू, प्राचार्य तसेच नगराध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्यांवर कार्य करताना डॉ. वाघमारे यांनी प्रत्येक पदाला न्याय देत आदर्शवत कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला ‘लातूर पॅटर्न’ हा केवळ निकालांचा नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मानदंड ठरला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
समाजप्रबोधनाची अखंड धडपड
डॉ. वाघमारे हे केवळ प्रशासक नव्हते, तर ते थोर विचारवंत, लेखक आणि समाजप्रबोधनकर्ते होते. आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांतून त्यांनी शिक्षण, सामाजिक समता, नैतिक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व यांचा पुरस्कार केला. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवतानाच त्यांना चांगले नागरिक घडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
कुटुंबीयांचे सांत्वन, कार्याची आठवण
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. “डॉ. वाघमारे सरांनी उभा केलेला शिक्षणाचा वारसा हा दीर्घकाळ प्रेरणादायी राहील,” असा विश्वास श्रद्धांजलीपर भाषणांत व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ लातूरपुरती मर्यादित न राहता राज्यभर आणि देशभरातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारी ठरली.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू
अंत्यसंस्कारावेळी अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले होते. “सरांनी आम्हाला केवळ अभ्यासच शिकवला नाही, तर आयुष्य कसे जगायचे हेही शिकवले,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे यांचे आयुष्य हे समर्पण, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचे प्रतीक होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.