लखनऊ : Yogi Adityanath यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अवैध व जहरीली दारूविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत राज्यात अवैध दारूची निर्मिती किंवा विक्री होऊ नये, असे आदेश त्यांनी आबकारी विभाग आणि पोलिस प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत होळीच्या काळात विशेष दक्षता बाळगण्यास सांगितले. सणासुदीच्या काळात अवैध दारूचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हानिहाय विशेष पथके स्थापन करून धाडसत्र राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या सीमांवर कडक तपासणी नाके उभारून बाहेरून येणाऱ्या संशयित मालावर लक्ष ठेवण्यासही सांगितले आहे.
अवैध दारूमुळे होणाऱ्या जीवितहानीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, नागरिकांनीही अवैध किंवा संशयास्पद दारूविक्रीबाबत त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात संयुक्त तपास मोहिमा राबवून हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर छापे टाकण्याचे नियोजन आहे. आबकारी विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधून व्यापक कारवाई होणार आहे.
राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, सण सुरक्षित आणि आनंदात पार पडावा यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अवैध दारूच्या साखळीला आळा घालण्यासाठी तांत्रिक पातळीवरही देखरेख वाढवली जाणार आहे.