Home Breaking News एसटी महामंडळात विभागीय बढती समितीची बैठक; पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती, सेवागुणवत्तेला मिळणार नवी...

एसटी महामंडळात विभागीय बढती समितीची बैठक; पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती, सेवागुणवत्तेला मिळणार नवी गती

42
0
📍 मंत्रालय | ०६ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात विभागीय बढती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांतील पात्र अधिकाऱ्यांच्या सेवाजेष्ठता, कार्यक्षमता, प्रामाणिक कामगिरी आणि प्रशासकीय योगदानाचा आढावा घेऊन त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना उच्च पदांवर बढती देण्यात आली असून, त्यांच्या दीर्घकालीन सेवेला आणि योगदानाला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन एसटीच्या कामकाजात अधिक वेग आणि पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एसटी महामंडळ हे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनवाहिनी मानले जाते. दररोज लाखो प्रवासी एसटी बससेवेवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रशासन अधिक मजबूत आणि जबाबदार असणे अत्यंत आवश्यक आहे. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांकडून आता सेवा सुधारणा, आर्थिक नियोजन, वेळेवर गाड्या धावणे, प्रवाशांना अधिक सुविधा आणि डिजिटल व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना, “एसटी महामंडळाच्या आर्थिक उन्नतीसाठी, तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्वांनी समर्पणाने काम करावे,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे, संघटनात्मक शिस्त आणि जनतेचा विश्वास टिकवणे ही आगामी काळातील प्रमुख जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले.
पदोन्नतीमुळे अधिकारीवर्गात उत्साहाचे वातावरण असून, “एसटीला पुन्हा एकदा सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी सर्वजण एकदिलाने प्रयत्न करू,” असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.