नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्चपासून तीन वर्षांची राष्ट्रव्यापी ‘ड्रग्सविरोधी मोहीम’ राबविण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरात अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असून, संपूर्ण यंत्रणा एकत्रितपणे काम करणार आहे.
नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (NCORD) च्या ९व्या उच्चस्तरीय बैठकीत बोलताना अमित शाह म्हणाले, “ड्रग्स ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर देशाच्या भविष्यासाठीचा गंभीर धोका आहे. तरुण पिढीला नशेपासून वाचवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर ठोस आणि वेळबद्ध कृती केली जाईल.”
या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक, विक्री आणि वापर यावर कठोर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे, पोलीस दल, सीमाशुल्क विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथके आणि इतर सुरक्षा यंत्रणा यामध्ये समन्वय साधून एकात्मिक कारवाई केली जाईल. प्रत्येक राज्याला ठोस उद्दिष्टे देण्यात येणार असून, ठरावीक कालावधीनंतर प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.
अमित शाह यांनी स्पष्ट केले की, “ही मोहीम केवळ कारवाईपुरती मर्यादित न राहता जनजागृतीवरही भर देणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग आणि शहरी वस्त्यांमध्ये नशाविरोधी जनजागृती कार्यक्रम राबवले जातील. तरुणांना योग्य दिशा देणे, पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढवणे आणि व्यसनमुक्तीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हेही या अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.”
ड्रग्समुळे वाढणारे गुन्हे, आरोग्य समस्या आणि सामाजिक अधःपतन लक्षात घेता, ही मोहीम देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अमली पदार्थांच्या जाळ्यावर निर्णायक घाव बसणार असून, “ड्रग्समुक्त भारत” हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.